मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. निधनानंतर १ दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता या शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नका असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मैदानावर खेळ खेळले जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये करा अशी मागणी भाजपनं केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लता मंगेशकरावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं. प्रत्येक व्यक्ती तत्त्वाचे पालन करते. लतादीदींनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि पंडित नेहरुंची देखील गाणी गायली नाहीत.
ओबीसी आरक्षणाबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, मागासवर्ग आयोगाकडे इम्परिकल डाटा आहे की, नाही हे कोणाला माहित नाही. मी तो वाचलेला नाही. त्यावर सध्या प्रतिक्रिया देणं योग्य नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्क ही फक्त मोकळी जागा नाही. ही जागा अनेक घटनांची मूक साक्षीदार आहे. इतिहासाशी आपल्याला जोडणारा दुवा आहे. लतादीदींचं स्मारक कुठे आणि कसं व्हावं यावर येत्या काळात वाद देखील होण्याची शक्यता आहे.