मुंबई: वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात केली. नवे कृषी कायदे का केले, याबाबतचे सत्य शेतकरी बांधवांना समजावून सांगण्यात आमचे प्रयत्न, तपश्चर्या कमी पडली. त्यामुळे देशाची मनापासून माफी मागतो, असे म्हणत, आगामी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असे त्यांनी जाहीर केले. यानंतर देशभरातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत, केवळ माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून मदत द्यावी लागले, अशी मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण केवळ माफी मागून चालणार नाही. तुमच्या चुकीमुळे ७०० कुटुंबांना नुकसान भोगावे लागत आहे. त्यामुळे त्यांना पीएम केअर फंडातून तातडीने आर्थिक मदत करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त तीन कृषी कायद्याविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत आंदोलन झाले. सरकार ऐकायला तयार नव्हते. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकार झुकले. या आंदोलनात शेतकरी मृत्यू झाले. ७०० हून अधिक शेतकरी दगावले. आता जर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होत असेल तर त्यात चूक काय आहे, पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडले आहेत. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी. देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यासाठी मदत करा. शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.