बनावट लसीकरणातील बड्या लोकांची गय नको; हायकोर्टाचे निर्देश

मुंबई : कोरोना बनावट लसीकरण तक्रारींचा तपास करणाऱ्या पोलिसांनी यामध्ये बड्या लोकांचा समावेश आहे की नाही, याचाही तपास करावा. तसे आढळल्यास त्यांना सोडू नये. या प्रकरणांतील प्रत्येक आरोपीला अटक करा, असे निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले.
बनावट लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांचे प्रतिजैव तपासण्यात येणार आहेत आणि त्यांच्या आरोग्यावर काही प्रतिकूल परिणाम झाला आहे का? याचीही पालिका तपासणी करणार आहे, असे मुंबई महापालिकेने मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले. गेल्या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई महापालिकेला बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय पावले उचलणार, असा सवाल केला होता.
पीडितांची चाचणी करण्यासाठी पालिका काय पावले उचलणार आहे, याची माहिती न्यायालयाला द्यावी. पीडितांना कोरोना लसीच्या नावाखाली कसला डोस देण्यात आला आहे, याचा तपास करण्यास सरकार व पालिका असमर्थ का आहे? हे राज्य सरकारचे अपयश आहे. आम्हांला गुरुवारपर्यंत माहिती द्या, असे हायकोर्टाने म्हटले.




