आरोग्य

आता कोविशील्डचा फक्त एकच डोस? लवकरच लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅाझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित केल्या जात असलेल्या कोविशील्ड या लसीचा एकच डोस पुरेसं संरक्षण देऊ शकेल का, याविषयी देशात अभ्यास करण्यात येणार आहे. महिनाभरात या अभ्यासाला सुरुवात होण्याची शक्यता असून, नवीन लसीकरण रणनीती ठरवताना याचा विचार केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली.

दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देणं आणि कोविशील्डच्या एकाच डोसची उपयुक्तता या दोन्ही विषयावर अभ्यास सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय समितीकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

सरकार पहिल्या आणि दुसर्‍या डोससाठी दोन वेगवेगळ्या लशींचा वापर करण्याबाबत अभ्यास करण्याचा विचार करत असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं होतं. एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅाझेनेका आणि फायझरच्या (Pfizer) लशीचा एकत्रित प्रभाव चांगला दिसून आला आहे.

सध्या भारतात वापरल्या जाणार्‍या कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या सर्व सर्व लसी दोन डोसच्या असून, त्यांच्या मिक्स आणि मॅच पद्धतीनं वापराला परवानगी नाही. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या निर्णयाच्या परिणामाचा आढावादेखील सरकारचं तज्ज्ञ पॅनेल घेणार आहे. यापूर्वी, चार ते सहा आठवडे असणारं अंतर एप्रिलमध्ये सहा-आठ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं होतं. आता कोव्हिशिल्डच्या एका डोसच्या कार्यक्षमतेबाबत केल्या जाणाऱ्या अभ्यासात बूस्टर डोसबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे. बूस्टर डोस पहिल्या डोसनंतर सहा किंवा १२ महिन्यांनी दिला जाऊ शकतो. याबाबतचा निर्णय अभ्यासातल्या निष्कर्षांवर अवलंबून आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जॉन्सन आणि जॉन्सनची जान्सेन आणि स्पुतनिक व्ही यांसारख्या इतर लसी एकाच डोसच्या आहेत. कोविशील्डचाही एक डोस उपयोगी ठरू शकतो. कारण अ‍ॅस्ट्रॅाझेनेकानं एकच डोस असलेली लस तयार करण्यासाठी काम सुरू केलं होतं, असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button