डोंबिवलीचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे निधन
डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डोंबिवलीचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डोंबिवली शहराचे पहिले नगराध्यक्ष श्रीपाद वामन पटवारी तथा आबासाहेब पटवारी यांच्या निधनानंतर सर्वच थरातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , सून, नातवंडे असा परिवार आहे. वृद्धापकाळाने आजारी असल्याने १५ दिवसापासून त्यांच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
सुरुवातीपासूनच राजकारणात सक्रीय असलेल्या आबासाहेबांनी १९७३-७४ साली आणीबाणीच्या काळात तुरुंगवास देखील भोगला होता. राजकारणाची आणि समाजकारणाची प्रचंड आवड असलेल्या आबासाहेबांनी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सुरु झालेली डोंबिवली गुढीपाडवा स्वागत यात्रा साता समुद्रापार पोहोचली. डोंबिवलीतील स्वागतयात्रेचा आदर्श ठेवत देश विदेशात स्वागत यात्रा काढली जाते. सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा कायमच पुढाकार राहिला आहे. डोंबिवली सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.