मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबाने एका वाईन व्यावसायिकासोबत भागीदारी केली आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता त्यांच्या या दाव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे-शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?, असा खोचक सवाल राऊतांनी केला.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपवर आपली भूमिका मांडली. ‘आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी आमच्या नावावर असेल, तर मी सोमय्यांच्या नावावर करुन द्यायला तयार आहे. कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शाह यांचा मुलगा ढोकळा विकतो का? असा सवाल संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? कुणी काही व्यवसाय करत असेल, कुणी काम करत असेल, बँकांना लुबाडणे आणि चोऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा काबाड-कष्ट करणे कधीही चांगले. भाजपचे लोकं काहीही बोलतात. मला शरद पवारांचा फोन होता, तेही हसत होते. आमच्या कुटुंबाच्या काही वायनऱ्या असतील तर सोमय्या यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, एखाद्या कंपनीत संचालक असणं हा काय गुन्हा आहे का? महाराष्ट्रातील राजकारणाला संस्कार आणि परंपरा आहे. तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुले काय करतात ते पाहा. आमची मुले ड्रग्स तर विकत नाहीत ना, किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
महाराष्ट्रात सध्या किराणा दुकानात वाईनच्या विक्रीवरुन सुरू झालेले प्रकरण चांगलेच तापले आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर भागीदारी असल्याचे म्हटले आहे. ‘संजय राऊतांच्या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत व्यावसायिक भागीदारी केली आहे. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे, असं सोमय्या म्हणाले.
अशोक गर्ग यांच्या मॅगपी ग्लोबल लिमिटेड कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करार केला आहे. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
मॅगपी कंपनीची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या घरात आहे. कंपनीने २ जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला सांगितले आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वईन विकण्यास परवानगी दिली. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही’, असंही किरीट सोमय्या म्हणाले.