![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/04/nana-patole.jpg)
मुंबई : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 25 लाखांचा इनाम असलेल्य़ा नक्षलवाद्याला पकडण्यास गेलेल्या 200 सुरक्षा जवानांच्या एका तुकडीला घेरून नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला (Sukma Naxal Attack) केला. यामध्ये 24 जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता झाला आहे. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा एका पत्रकाराला फोन करून नक्षलवाद्यांनी (Naxalite) अट ठेवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या जवानाला सुखरुप परत आणण्यासाठी मोदी सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केलाय.
नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोच्या जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही मोदी सरकारकडून या जवानाच्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे केवळ निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्र्वर सिंग मिनहास यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये. सत्तेच्या लालसेपायी देशाचा कारभार वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरणाऱ्या निवडणूकजिवी मोदी-शहांना जवानांच्या जिवाची जरा तरी किंमत आहे का?, असा प्रश्न काँग्रेसने ट्विट करुन विचारलाय. तसेच, मोदी आणि शहा हे निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातच व्यस्त असल्याचाही आरोप काँग्रेसने केलाय.
कुख्यात नक्षलवादी हिडमा याला पकडण्यासाठी जवान रविवारी त्याच्या परिसरात गेले होते. 2000 जवानांची मोठी टीम वेगवेगळ्या भागात हिडमाला पकडण्यासाठी जंगलात घुसत होती. मात्र, नक्षलवाद्यांनी या जवानांना कोणत्याही प्रकारे न रोखता आतमध्ये जाऊ दिले आणि घात केला. सुरक्षा दलाच्या काही टीम तयार करण्यात आल्या होत्या. घनदाट जंगलात त्यांना कोपरान कोपरा शोधायचा होता. मात्र, नक्षलवादी त्यांची वाटच पाहत होते. अनेट तुकड्यांपैकी एका तुकडीला नक्षलवाद्यानी तीन बाजुंनी घेरले आणि हिडमाच्या बटालियनने हल्ला केला. यामध्ये हे जवान शहीद झाले. हिडमाची बटालियन डोंगररांगांतून फायरिंग करत होती. त्यामुळे खाली असलेले जवान सहज लक्ष्य ठरले. तिन्ही बाजुंनी घेरलेल्या जवानांनी त्याही परिस्थितीत हिडमाच्या मोक्याच्या जागी लपलेल्या आणि हल्ला करत असलेल्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले.