मुंबई : एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातं आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केला आहे. त्याचबरोबर माझ्यावर कोणतीही कारवाई करताना खात्री करा, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे. माझ्यावर वाईट हेतूने करण्यात आलेल्या चुकीच्या आरोपांप्रकरणी कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होणार नाही याबाबत खात्री करा, अशी विनंती केली आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्यावर अनेक उलटसुलट आरोप केले. तर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. साक्षीदाराच्या खळबळजनक आरोपांवरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आर्यन खानचा एक व्हिडिओ ट्विट करत नवा पुरावा समोर आणला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता भलतंच वळण लागण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांनी पत्रात म्हटले आहे की, एनसीबीमध्ये सुरु असलेल्या कारवाईत अज्ञात व्यक्तींनी मला खोटे ठरवण्यासाठी कट रचला असून माझ्याविरोधात कायदेशीर कारवाईची देखील योजना आखली आहे, असं म्हटलं आहे. तसेच हे तुमच्या निदर्शनास आणून देत आहे की, उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी यासंदर्भात ही बाब आधीच महानिदेशक, एनसीबीकडे पत्राद्वारे आवश्यक कारवाईसाठी पाठवली आहे.
त्याचप्रमाणे मी तुमच्या निदर्शनास आणून दिले आहे की, अत्यंत आदरणीय राजकारण्यांनी सार्वजनिक माध्यमांवर माझ्याविरोधात तुरुंगवास आणि बडतर्फीची धमकी दिली आहे, अशी माहिती पत्राद्वारे दिली आहे. या पत्राची प्रत राज्याचे पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस महासंचालक यांना देखील वानखेडे यांनी पाठवली आहे.
वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; पोलीस महासंचालकांचे स्पष्टीकरण
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबईपोलिसांच्या साध्या वेशातील पोलिसांकडून हेरगिरी केल्याप्रकरणी वानखेडे यांनी तक्रार मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सादर केले होते. तसेच त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देखील तक्रार केली होती. मात्र, वानखेडे यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचं संजय पांडे यांनी म्हटले आहे. ओशिवारा पोलिसांनी स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हापासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली होती.