Top Newsराजकारण

तुटेपर्यंत ताणू नका; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा आवाहन

...तर उद्या कोतवाल, पोलीस पाटीलही विलीनीकरणासाठी पुढे येतील!

पुणे: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. विलीनीकरणाचं प्रकरण हायकोर्टात आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांनी आता थांबलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांचा जसा विषय आहे. तसा प्रवाशांचाही विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून निवडणुका बिनविरोध झाल्या

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्याला आम्हीच जबाबदार आहोत का? सरकारच दुधखुळं आणि विरोधक काहीच करत नाही असं काही आहे का? टाळी एका हाताने वाजते का महाराज? दोन हात लागतात ना? बिनविरोध निवडणूक लढवण्याबाबत पहिलं स्टेटमेंट कुणी काढलं? विरोधकांनी काढलं. काही केलं तरी मुंबईत दोनच उमेदवार निवडून येणार होते. तिसरा फॉर्म आला. त्या उमेदवाराला लढण्यात काही अर्थ नसल्याचं वाटलं. त्याने माघार घेतली. कोल्हापुरात कितीही गप्पा मारल्या, कितीही आवाज काढले तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते होती. काँग्रेसची त्याखालोखाल मते होती. तर धुळे-नंदूरबारमध्ये अमरीश पटेल कुठेही गेले तरी ते विजयी होतात. ते भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. अशा ६ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या. नागपूरमध्ये परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

ज्याच्या जागा त्याला द्यायचं ठरलं

वाशिममध्ये निवडणूक आहेत. शिवसेनेचे उमेदवार बजोरीया मागे निवडून आले आहेत. तिथेही निवडणूक होत आहे. सहा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कुठेही नव्हता. ज्याच्या जागा त्याला द्यायच्या हे ठरलं होतं. म्हणून एका ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसने माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, काँग्रेसचा उमेदवार होता. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने निवडणूक लागलेली दिसते, असं ते म्हणाले.

पटोलेंना शुभेच्छा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. २०२४ ला काँग्रेस महाराष्ट्रात आणि देशात मोठा पक्ष होणार आहे असं पटोले म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पटोलेंना आमच्या शुभेच्छा आहेत, असं ते म्हणाले.

ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, नारायण राणेंना टोला

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हवाच काढून घेतली आहे. त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा दावा केला. ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत. आमच्यातील अनेक मान्यवरांनी सरकार चाललं आहे. सरकारला काहीही धोका नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.

विमानतळावर कोरोना प्रमाणपत्रांची तपासणी नाही

यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हायरसबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. परराज्यातून विमानाने येणाऱ्या प्रवाश्यांची यापुढे विमातळावर पुन्हा कोरोनाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही. हवाई प्रवास करणारे सर्व प्रवासी हे प्रवास सुरु कारण्यापूर्वीच कोरोनाच्या सर्व तपासण्या तसेच लसीकरणाची माहिती देऊनच प्रवासाला सुरुवात करतात. त्यामुळं ते प्रवासी पुण्यात पोहचल्यानंतर त्याचा कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन- अडीच तास रांगेत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे यापुढे बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेलया नियमावलीचे पालन केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button