फोकस

पोलीस ठाण्यात आलेल्या जखमी तक्रारदारास परस्पर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवू नका !

मुंबई पोलीस आयुक्तांचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश

मुंबई : एखादी जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यावर त्याला परस्पर वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलला पाठविले जाते. त्या व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील आणण्यास सांगितले जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे. परंतू हा प्रकार पोलीस नियमांना धरून नसल्याने याची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असे चालणार नाही. तक्रार देण्यास आलेल्या जखमी व्यक्तीसोबत एका अंमलदारास आधी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवावा. जे कर्मचारी या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही नगराळे यांनी दिले आहेत.

एखादी जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्याची आधी वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असते. त्यामुळे त्या व्यक्तीला एका अंमलदारासोबत वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलला पाठवावे असा नियम आहे. मात्र पोलीस ठाण्याकडून कोणतीही मदत न देता तक्रार देण्यास आलेल्या जखमी व्यक्तीस परस्पर हॉस्पिटलमधून उपचार घेण्यास सांगितले जाते. इतकेच नाही तर स्वत:चे वैद्यकीय प्रमाणपत्र आणायला लावले जाते. हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे.

याचबरोबर, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, यापुढे पोलीस जखमी व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी मेमो देतील, पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद करतील आणि त्यानंतर जखमी व्यक्तीसह पोलीस हवालदार उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवावं आणि नंतर कायदेशीर प्रक्रियेस पुढे जावे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास तर वाढेलच पण त्यासोबतच पोलीस आणि नागरिकांमध्ये एक जवळीकही निर्माण होईल, असा विश्वास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिसांचा आदेश सर्व पोलिस ठाणे, गुन्हे शाखे, सर्व पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना पाठवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button