Top Newsराजकारण

‘दिवाळी भेट’ ! पेट्रोल ५ रुपयांनी, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त

मुंबई : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दणका बसल्यानंतर आणि जनतेचा आक्रोश वाढल्यानंतर दिवाळी भेटीच्या नावाखाली मोदी सरकारने पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू होणार आहेत.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सामान्य जनता महागाईमध्ये भरडली जात असताना केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रुपये तर डिझेलमागे १० रुपये कमी करून तात्पुरता का होईना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने नागरिकांना दिवाळी भेट दिल्याची चर्चा आहे. भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज ३५ पैशांनी महाग होत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली आहे.

मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा : राहुल गांधी

वाढत्या महागाईविरोधात विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही काही शहरांमध्ये पेट्रोलची ११० रुपये अधिक दराने विक्री होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारीच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. दिवाळीच्या काळात महागाई शिगेला पोहोचली आहे म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. आज दिवाळी आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. हा विनोद नाही. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत.

दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना, मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून ही महागाई दिली आहे, असं म्हणत निशाणा साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button