ज्यांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांच्या व्यथा समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला
पुणे: खेड पंचायत समितीत शिवसेनेचं बहुमत असतानाही पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या आमदारांना समजून घ्या, असा टोला दिलीप मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचं बहुमत असतानाही खेड पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाल्याने वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी पडद्यामागून सूत्रे हलविल्यानेच राष्ट्रवादीला खेड पंचायतीवर वर्चस्व निर्माण करता आलं असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडींवर मोहिते-पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या, असं सांगतानाच हा स्थानिक पातळीवरचा वाद आहे. त्याचा राज्य सरकारवर काहीच फरक पडणार नाही. आम्ही आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मानत आहोत, असं मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केलं.
खेड तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याच कारण काय ते मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर हे सभापती झाल्यानंतर सहा महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करण्यात येणार होता. तसं पोखरकर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र सहा महिन्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला. या सर्व घटना घडल्यानंतर याला वेगळं वळण देण्याचं काम माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केलं, असा दावा त्यांनी केला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी खेडमध्ये येऊन गैरसमजातून वक्तव्य केलं होतं. आघाडीचा घटक असल्याने त्यांनी मला बोलावून घ्यायला हवं होतं. एकत्र काम करू, असं त्यांनी सांगायला हवं होतं. पण आढळराव पाटीलांनी संजय राऊत यांना खोटी माहिती दिली. त्यामुळे राऊतांनी मीडियात चुकीचं विधान केलं. आमच्या नेत्यांनी राऊत यांच्या ते निदर्शनास आणून दिलं, असं सांगतानाच हा स्थानिक पातळीवरचा वाद आहे. राज्यात त्याचा काहीच फरक पडणार नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मानतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवाजी आढळराव पाटील हे माजी खासदार झाले. त्यामुळे त्यांचा शिवसेनेला फारसा फायदा आहे, असं मला असं वाटत नाही. एखाद्या माजी खासदारासाठी दोन्ही पक्षात वाद होईल असं मला वाटत नाही. स्थानिक पातळीवर आम्ही आमचे निर्णय घेत असतो. त्यात वरिष्ठांची भूमिका नसते, असं सांगतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कुठलाही वाद नाही. काही लोकांना (शिवाजी आढळराव पाटील) वादाशिवाय करमत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.