सांप्रतकाळी पत्रकारिता ही ‘चाय बिस्कुट छाप’ व ‘पाकीट छाप’ झालेली आहे ,पण आम्ही हाडाचे ( म्हणजे पत्रकारितेपायी अनेकदा हाडं मोडून घेतलेले) पत्रकार असल्यामुळे (आणि अजूनही आमच्या शरीरात काही अखंड, अभंग हाडं शिल्लक असल्यामुळे)आम्ही अजूनही ‘चाय बिस्कुट’ने आणि मिळालेल्या ‘पाकीट’ने ओशाळे न होता निर्भीड पत्रकारिता करीत आहोत. आम्ही तसे कोणाच्याही बाजूचे नाही. आमचे काही नतद्रष्ट मित्र ( नतद्रष्ट मित्र का फक्त राजकारणातच असतात का ? ते पत्रकारितेतही असतात !) असं म्हणतात, की कोणी आम्हाला बाजूलाही उभं करत नसल्यामुळेच आम्ही कोणाच्याही बाजूचे असूच शकत नाही ! असू देत. आम्ही आहोत तसे आहोत. किंबहुना आम्ही असे आहोत म्हणूनच तर पत्रकारितेत टिकून आहोत. राजकारण असो की पत्रकारिता, टिकून राहण्यासाठी कोडगेपणा अंगी असावाच लागतो ! असो.
तर, काय सांगत होतो, की जी गुपितं ते ‘व्यक्तिमत्त्व विकास’वाले हजारो रुपये घेऊन सांगतात ती सर्व गुपितं आमच्या प्रधान सेवकांनी आम्हां अज्ञ देशवासियांना (देशवासीयांनी ‘त्यांना’ लागोपाठ दोनदा सत्ता दिली याचा या विशेषणाशी दुरान्वयेही संबंध नाही.) अगदी सहजपणे सांगून टाकलीत. त्यातलं एक तर आम्हांला फार म्हणजे फारच आवडलं .’ कठीण प्रश्न सर्वात आधी सोडवा !’. ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कठीण गोष्टींनीच करतात म्हणे! बागेतल्या मोरांना दाणे टाकणे म्हणजे काय सोपी गोष्ट वाटली की काय तुम्हाला ? हातात चार दाणे घेतले आणि ‘आ आ आ ‘ केलं की आले मोर बारामतीपासून अहमदाबादपर्यंत उडत ; इतकं काही सोपं नसतं ते. तर परीक्षा असो, की रोजचा दिवस, सुरुवात ही कठीण प्रश्नानेच करण्याबाबत कोणाचा काय अनुभव आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही लोकांना भेटून त्यांची मनोगतं जाणून घेतली.त्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
१) देवानाना नागपूरकर – ज्या अर्थी आमचे आदरणीय नेते कठीण प्रश्न आधी सोडवावा असं म्हणतात आणि त्याठिकाणी ते स्वतःच्या दिवसाची सुरुवात कठीण गोष्टींनी करतात ; त्या अर्थी मी त्यांचं अनुकरण करायलाच हवं.आता काही लोकांचं म्हणावं तर त्यांना सर्वच इतकं कठीण वाटतं, की ना ते बोलायला तोंड उघडत ना घरातून बाहेर पडत. जाऊ द्या. त्यांचं ते जाणोत. माझ्याबाबतीत बोलायचं तर ,दीड वर्षांपासून माझ्यापुढचा सर्वात कठीण प्रश्न आहे तो म्हणजे, मी परत कसा येईन ? दिवसरात्र मी त्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतो,पण यश काही येत नाही. शेवटी मी आता त्यावर एक उपाय शोधून काढला आहे . रोज सकाळी मी हिला, ‘ अग, मी जरा बाहेर जाऊन येतो. दहा मिनिटांत परत येईन.’ असं सांगून बाहेर पडतो आणि दहा मिनिटं बाहेर भटकून परत घरी येतो ! ‘आलो बुवा परत एकदाचा !’ असं म्हणून स्वतःचं समाधान करून घेतो !
२) चंदा कोल्हापूरकर – या देवानानांची दिल्लीला रवानगी कशी करावी हाच माझ्यापुढचा सर्वात कठीण प्रश्न आहे. ती सहाव्या मजल्यावरची खुर्ची काही त्यांच्या डोक्यातून निघायला तयार नाही. मध्यंतरी मी अध्यात्मावरची दोनचार पुस्तकं वाचून त्यांना ‘ परमेश्वर सर्वांचा हिशेब बरोबर करतो.’ असं सांगून , ‘ परमेश्वराने तुमचाही हिशेब बरोबरच केलेला आहे ,आता निघा दिल्लीला.’ असं आडून आडून सुचवूनही पाहिलं, पण गडी ढिम्म हलायला तयार नाही. हाच एक कठीण प्रश्न सोडवता सोडवता आयुष्याचा एक एक दिवस निघून चालला आहे. बघू परमेश्वर आता आपला हिशेब कसा करतो ते !
3) एक वाचाळ संपादक – माझ्यासाठी कठीण काहीच नाही. कळलं का ? ज्यांना असं काही कठीण रोज सकाळी डोळ्यासमोर दिसत असेल त्यांनी सरळ सगळा कारभार आमच्या उधोजीराजेंना सोपवावा आणि अंगाला राख फासून हिमालयात जावं निघून. दाढी तर अगोदरच वाढलेली आहे. नाही का ? आमचे उधोजीराजे सांभाळतील सगळं व्यवस्थित. बरं का . चला.
४) उधोजीराजे – कसा सोडवणार कठीण प्रश्न आधी ? मुळात कोणता प्रश्न कठीण आहे ते नको का कळायला ? किंबहुना सगळेच प्रश्न कठीण वाटत असले तर काय करावं माणसाने ? आता ज्या विषयांत आपल्याला ओ की ठो कळत नाही त्याच विषयांवर जर माणसाला दिवसभरात पाच सहा व्ही. सी. कराव्या लागत असतील तर सगळंच कठीण वाटणारच ना ? मग आधी कोणती व्ही.सी. करावी ? जाऊ द्या. धकतंय ना कसं तरी ?
५) बाळराजे – मला तर कुठलाच टास्क डीफीकल्ट वाटत नाही. थिंग्स आर सो सिम्पल. सेक्रेटरी सांगेल ते रिसाईट करून बाहेर बोलायचं ! अरे हो, ‘नाईट लाईफ’ लवकरात लवकर परत कशी सुरू करायची हा मात्र
डीफीकल्ट क्वेश्चन आहे बरं का ! पण तो माझ्या हातात कुठे आहे ?
६) चुलत राजे – मुळात मुद्दा असा आहे की, त्यांना जर शिकवायची इतकी हौस होती तर शिक्षक व्हायचं ना एखाद्या प्राथमिक शाळेत . तेवढे तरी शिकले आहेत की नाही रामजाने .कशाला आले राजकारणात ? कळतं ज्याचं त्याला, की दिवसाची सुरुवात कशी करायची, कोणता प्रश्न आधी सोडवायचा , कोणता नंतर सोडवायचा. जे सांभाळायचं ते सांभाळता आलं नाही म्हणून दिलं सोडून आणि चालले दुसऱ्यांना उपदेश करायला.
७) दादासाहेब बारामतीकर – ते काय शिकवतील मला कठीण प्रश्न आधी सोडवायचा म्हणून ? त्या ठिकाणी मी तर पहाटे पहाटेच गेलो होतो ना ‘ कठीण प्रश्न’ सोडवायला ? आरं, अख्ख धरण भरायची हिंमत ठेवणारा मी , माझ्यासाठी कसला आला आहे कठीण प्रश्न ? उगाच आपलं काहीतरी.
८) भानामतीकर साहेब – सगळ्यात कठीण प्रश्न तर हा आहे, की आपणच हट्टाने जन्माला घातलेलं हे ‘बाळ’ तिरपागडं आणि गतिमंद निघालं. आता त्याला किती दिवस सांभाळायचं आणि सांभाळायचं तरी का ? त्या ‘ अहमदाबाद डिल’चं फलित अजून काही दृष्टिपथात दिसत नाही. बंद खोलीत केलेल्या चर्चेत दगाबाजी करण्याचा त्या ‘ कमळी’चा स्वभावच आहे की काय अशी शंका आता यायला लागली आहे. आयुष्यभर लोकांना ‘ कात्रजचा घाट’ दाखवत आलो. आता या उतारवयात स्वतःच ‘ कात्रजच्या घाटात’ अडकलोय की काय असं वाटू लागलंय!
(लेखकाचा संपर्क ७८७५० ७७७२८)