देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटणार
अमरावती : अमरावती जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लशींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब लक्षात घेता लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लससाठा पुरविण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील कोविड केअर युनिटला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी फडणवीस यांनी करोना रुग्णांची संख्या, औषधांचा साठा, बेड्स, ऑक्सिजन पुरवठा तसेच लसीकरण मोहीम याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लशींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लससाठा मिळायला हवा. तसे झाल्यास तुटवडा भासणार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून मागणी करणार आहे असे, असे फडणवीस म्हणाले. केंद्राकडून महाराष्ट्राला लशीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीच सांगितल्यानुसार, महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे केंद्राकडून लस पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण करण्यात काही तथ्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.