म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबत सरकारकडून फसवणूक : फडणवीस
गोंदिया : राज्यातील विविध भागात म्युकरमायकोसिसमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अशावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारची ही घोषणा फसवी आहे. राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नसल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचाराचा सर्व खर्च केला जाईल. तसंच त्यांना लागणाऱ्या औषधाच्या खर्चाचा समावेशही या योजनेत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसंच म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश या योजनेत केल्याचं परिपत्रकही राज्य सरकारनं जारी केलं आहे. अशावेळी राज्यात कुठेही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची ही घोषणा फसवी आहे. असा आरोप फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसचा रुग्ण कोणत्याही रुग्णालयात भरती असेल तर त्याला मोफत इंजेक्शन्स देण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी सरकार बनवाबनवी करत आहे असं आपण म्हणत नाही, पण सरकारने जनताभिमुख कामे करावी, असा सल्लाही फडणवीसांनी यावेळी दिला.
महाविकास आघाडी सरकारकडून कोरोना रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवले जात असल्याचा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. इतकंच नाही तर कोरोना रुग्णांचे आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे आकडे लपवले जात असल्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. फडणवीस यांनी यापूर्वीही अशा प्रकारचा दावा केला होता.