Top Newsराजकारण

देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड गुप्त भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी लालबागच्या ‘सुखकर्ता’ इमारतीमध्ये वितरित केलेल्या गाळ्यांच्या स्थगितीचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जवळपास दोन तास आव्हाड ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णतः अनभिज्ञ होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत एकांतात भेट झाल्यानंतर आणि त्याआधीपासूनच राज्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या या दोन नेत्यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी दुपारी शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी लालबाग परिसरात कॅन्सरग्रस्तांना वितरित करण्यात आलेल्या १०० गाळ्यांच्या विरोधात उसळलेल्या जनक्षोभाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदार चौधरींच्या त्याच पत्रावर शेरा मारत गाळे वितरणाला स्थगितीचे आदेश आपल्या प्रधान सचिवांना लगोलग देऊन टाकले.

मुख्यमंत्र्यांच्या तत्काळ स्थगितीचे पडसाद सत्तेतील तिन्ही पक्षात आणि प्रशासनामध्ये जोरदाररित्या उमटले. त्याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री आव्हाड यांनी आपली सरकारी गाडी, पोलिसांचा बंदोबस्त, शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा सोडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेण्यासाठी आव्हाड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत फडणवीस यांच्या बंगल्यावर पोहोचले होते, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

या भेटीबाबत मंत्रिमंडळातील आपले ज्येष्ठ सहकारी तर सोडाच; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हाड यांनी काहीच अवगत केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आव्हाड-फडणवीस यांच्या भेटीबाबत चर्चा सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या विश्वसनीय सहकार्‍याने आव्हाड यांना संपर्क साधून या भेटीबाबत विचारणा केली. त्यावेळेस आव्हाड यांनी आपण पोलिसांच्या घरासंदर्भात माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांच्या घरांबाबत माजी मुख्यमंत्री फडणवीस चर्चेसाठी माझ्या बंगल्यावर येणार होते. मात्र, त्यांच्या ज्येष्ठतेचा आब राखण्यासाठी आपणच त्यांना भेटण्यासाठी गेल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केले नव्हते का, अशी विचारणा ठाकरे यांच्या प्रतिनिधींकडून होताच आव्हाड यांनी वेळ मारून नेण्याचाच प्रयत्न केला.

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. पक्षात आणि पक्षाबाहेरही ते पवारांचे कमालीचे निष्ठावंत म्हणून परिचित आहेत. साहजिकच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आव्हाड यांना त्यांच्या मंत्रालयात काम करण्यास पुरेशी मोकळीक दिली आहे. तरीही आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना निवासी गाळे वितरित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य ते महत्व दिले नव्हते. आणि आता त्यानंतर पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चेच्या वेळी गृहनिर्माण विभागाचे सचिव, अधिकारी किंवा सहकारी राज्यमंत्री यांना फडणवीस यांच्याकडे सोबत न नेताच करण्यात आलेल्या बैठकीतून काय साध्य होणार असा प्रश्नही मुख्यमंत्री ठाकरेंच्या कोअर टीममधून विचारण्यात येत आहे.

आव्हाडांबाबतच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या भेटीने आव्हाडांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता एका ज्येष्ठ मंत्र्याने बोलून दाखवली आहे. भेटीत मध्यस्थी करणारे प्रवीण दरेकर यांनीही याबाबत कानावर हात ठेवल्याने या चर्चेचे गूढ वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button