राजकारण

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? : नवाब मलिक

मुंबई: सरकारच्या परवानगीनेच फोन टॅप केले होते. मात्र, आता मला बळीचा बकरा केलं जात आहे, असा दावा ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?, असा थेट सवालच नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांना थेट सवाल केला. रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल मलिक यांनी केला आहे. रश्मी शुक्लांच्या वकिलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅप करण्यासाठी दिशाभूल करून परवानगी घेण्यात आली आहे, असा आरोपहीही त्यांनी केला आहे.

नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या. पुण्याच्या सीपी असताना त्या काळातील खासदार, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे, असं सांगतानाच आपली बदली झाल्याचं त्या ज्यापद्धतीने सांगत आहेत. त्यात काही तथ्य नाही. त्यांची ट्रान्स्फर झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पोलीस महासंचालकांच्या आदेशावरुनच रश्मी शुक्ला यांनी काही फोनवर देखरेख केली. रश्मी शुक्ला या पोलीस प्रमुखांच्या आदेशांचं पालन करत होत्या. शुक्ला यांनी टेलिग्राफ अधिनियमांनुसार राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती. मात्र आता रश्मी शुक्ला यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, असा दावा शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात केला. सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांना १७ जुलै २०२० पासून २९ जुलै २०२० पर्यंत फोन टॅपिंगची परवानगी दिली होती. कुंटे यांनी २५ मार्च २०२१ रोजी सरकारला जो रिपोर्ट सादर केला, त्यामध्येही ही बाब नमूद आहे. मात्र ही परवानगी घेताना आपल्याला भ्रमित केलं होतं असं नंतर कुंटेंनी सांगितलं. त्यामुळे आता रश्मी शुक्लांना बळीचा बकरा केलं जात आहे, असं जेठमलानी म्हणाले.

गुन्हे रोखण्यासाठी कायद्याच्या बंधनात राहून वायरलेस संदेशांवर देखरेख ठेवणे, टॅप करणे हे नियमांना धरून आहे, असा दावा रश्मी शुक्लांच्या वकिलांनी केला. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होईल. तोपर्यंत पोलिसांनी शुक्ला यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा अटकेची कारवाई करु नये, असं हायकोर्टाने निर्देश दिले. रश्मी शुक्ला सध्या सीआरपीएफ च्या अतिरिक्त महासंचालक आहेत. सध्या त्या हैदराबादमध्ये सेवा बजावत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button