Top Newsराजकारण

‘देर आये दुरुस्त आये’ : नवाब मलिक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना देशातील १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल अशी घोषणा केली आहे. केंद्राने सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोला लगावत उशिरा का होईना केंद्राला निर्णय घ्यावा लागलाय. आता राज्यांना व लोकांना लस पुरवठा मागणीनुसार होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान देशातील जनतेशी संबोधन करण्यासाठी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता टीव्हीवर येत होते, मात्र आज वेळेअगोदरच लोकांशी संवाद साधण्यासाठी टीव्हीवर आले असेही नवाब मलिक म्हणाले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांची जबाबदारी ही मोदी सरकारने राज्य सरकारांवर ढकलली होती मात्र आज केंद्रसरकार सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. यामागेसुध्दा तीन कारणे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद संसदेत करण्यात आली होती. तशी मान्यताही घेण्यात आली. शिवाय जी २५ टक्के लस उपलब्ध होती त्याची पूर्तताही केंद्राकडून होत नव्हती. राज्यांना ३०० ते ४०० रुपये दराने लस खरेदी करण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र राज्यातील जनतेला लसपुरवठा वेळेवर होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत होते. विशेष करून सुप्रीम कोर्टाने राज्य व केंद्राचे लसीबाबतचे दर वेगवेगळे का? ३५ हजार कोटीची तरतूद करुनही पैसे का खर्च करत नाहीय असा सवाल केंद्रसरकारला करत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. केंद्रसरकारच्या प्रतिमेवर व निर्णयावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याने सरकारचे अपयश व प्रतिमा सुधारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केल्याचे सत्य नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडले आहे.

लसीकरणाबाबत मोदी सरकार भूमिका व निर्णय बदलत असल्याने त्यावर सातत्याने आम्ही बोट ठेवत योग्य नसल्याचे मोदी सरकारच्या निदर्शनास आणून देत होतो. आता सुरुवातीपासून असलेली जबाबदारी केंद्रसरकारने स्वीकारली आहे आता अपेक्षा आहे हे सर्व वेळेत मिळेल असेही नवाब मलिक म्हणाले.

पुन्हा एकदा मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली : दरेकर

नरेंद्र मोदी हे गरीबांची काळजी घेणारे पंतप्रधान ठरले असून पुन्हा एकदा संकटात पंतप्रधान मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

गरीबांचे काळजी घेणारे पंतप्रधान आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशातील ८० कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेत वाढ करत पुन्हा अन्नधान्य देण्यात येणार असल्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. केंद्रावर टीका करणाऱ्यांना सांगायचे आहे की, शेवटी केंद्र सरकारच आपल्या मदतीला आले आहे. समन्वयातूनच संकटातून आपण बाहेर येऊ या संकटावर सामना करण्यासाठी केंद्र सोबत एकत्र येऊन लढा देऊ असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केले आहे.

देशातील २ मुख्यमंत्र्यांना मोदींनी लायकी दाखवली

भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करुन तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्रा लागू केली आहे. सोमवारी केलेल्या जाहीर संबोधनात पंतप्रधानांनी जनतेला दिलासा देणारी सर्वांना मोफत लसींच्या योजनेची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनात देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली आहे, अशी अप्रत्यक्षरित्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आली आहे. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button