Top Newsराजकारण

सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचंच; अजितदादांची कबुली

पुणे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. त्यावेळी सोमय्यांना त्यांच्या निवासस्थानी तब्बल 6 तास स्थानबद्ध करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही त्यांना एक नोटीस दाखवून कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी कबुली दिली आहे. किरीट सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं, असं अजित पवार यांनी म्हटलं.

सोमय्या यांच्याबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं घडलं. कुणाला काही पाहणी करायची असेल तर ती करु द्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. त्याबाबत विचारलं असता, कुणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करु. त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या. मला त्यावर काही म्हणायचं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

राज्यातील महिला अत्याचाराबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई-वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे. ७० ते ७५ टक्के घटना या जवळच्या लोकांकडून घडत असतात. त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे की ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. असे १०० अजित पवार खिशात घालून फिरतात असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, मला त्यावर काही बोलायचं नाही. मी फक्त विकासावर बोलेन. तुम्ही माध्यमं तरी कशाला अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देता. अशा वक्तव्याला प्रसिद्धी देऊ नका, असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

वॉर्ड रचनेबाबत आघाडीत वाद होणार नाही

राज्य सरकारने मुंबई वगळता इतर महापालिकेत तीन प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काँग्रेससह आघाडीतील काही मंत्र्यांनी विरोध केला आहे. या प्रभाग पद्धतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विरोध असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वॉर्ड रचनेबाबत आघाडीत वाद होणार नाही. काही काळजी करू नका. यावर येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. कारण आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलीय, असं सांगतानाच पण असल्या विषयात मला रस नाही. मला विकास कामाच्या बाबतीत काय विचारायचे ते विचारा, असले प्रश्न विचारू नका, असं पवार यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button