मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार आरोप करताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर झालेल्या सुनावणीवेळी माझ्यावर करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा आरोप अमान्य असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात माझगाव न्यायालयात हजेरी लावली. तुमच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. यावर अब्रुनुकसानीचे आरोप अमान्य असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
आमच्या आणि त्यांच्या वकिलांकडून काही गोष्टी मांडण्यात आल्या. न्यायालयाने विचारले की, तुमच्यावरील अब्रुनुकसानीचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हे आरोप अजिबात मान्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले. हे आरोप मान्य करायला अजिबात तयार नाही. जे काही सांगितले आहे, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयाला सादर करू. आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
त्यांनी स्वतःचे नाव मोहित भारतीय ठेवलेय
आमच्या वकिलांनी मोहित कंबोज यांचा ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरणही न्यायालयासमोर ठेवले आहे. तसेच त्यांच्यावरील सीबीआय छाप्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाव बदलून आपली ओळख लपवली आहे. आधी नाव मोहित कंबोज होते, मात्र घोटाळा समोर यायला सुरुवात झाल्यावर त्यांनी स्वतःचे नाव मोहित भारतीय ठेवलं. आम्ही या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर मांडल्यात, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला असून, तसा बाँड दिला आहे. यापुढे जेव्हा न्यायालयात तारीख असेल तेव्हा आम्ही न्यायालयात हजर होऊ, असे मलिक यांनी म्हटले आहे.