स्पोर्ट्स

डेल स्टेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त

मुंबई : जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव, ‘स्विंग किंग’ म्हणून प्रसिद्ध असा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटमधून निवृ्त्तीचा निर्णय़ घेतला आहे. त्याने काही वेळापूर्वीच स्वत:च्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती देत हे जाहीर केलं. त्याने यावेळी काही आठवणीतील फोटो आणि आपलं स्टेटमेंट ट्विट केलं आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या स्टेनने एक काळ गाजवला होता. भल्या भल्या दिग्गजांना तंबूत धाडणाऱ्या स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ६९९ विकेट्स घेतले आहेत. डेल स्टेनने शेअर केलेल्या निवृत्तीच्या संदेशात लिहिलं आहे, ’२० वर्ष सराव, सामना, विजय, पराभव या साऱ्यात अनेक आठवणी असून अनेकांच यासाठी धन्यवाद. मी आज अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर करत आहे. सर्वांच पुन्हा एकदा धन्यवाद.’

डेल स्टेनने २००४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर हळूहळू एकदिवसीय संघात मग टी-२० संघातही डेलनं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील काही खास बोलर्समध्ये स्टेनचा नंबर लागतो. डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत आयपीएलही चांगलीच गाजवली. डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघाकडून खेळलेल्या स्टेनने सुरुवातीच्या पर्वात उत्तम कामगिरी केली होती. आता अखेरच्या काही पर्वात दुखापतींनी ग्रस्त डेलवरही विराट कोहलीने भरोसा दाखवत संघात खेळवलं होतं.

डेल स्टेन २००८ साली दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वात जलदगतीने १०० कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने एका वर्षी १४ सामन्यात १८.१० च्या सरासरीने ८६ विकेट्स घेत आयसीसी प्लेयर ऑफ द इयरचा किताबही पटकावला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया गाजवल्यानंतर स्टेनने २०१० भारतीय भूमीवरही आपला जलवा दाखवला होता. त्याने नागपूरमध्ये एका सामन्यात ५१ धावा देत ७ विकेट्स मिळवल्या होत्या. पण हळूहळू दुखापतींनी स्टेनला ग्रासलं आणि त्याची गोलंदाजीतील कमाल कमी होऊ लागलीय त्याला हॅमस्ट्रिंग आणि खांद्याच्या दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर जावं लागलं. स्टेनच्या नावावर सर्वात जलद ४०० कसोटी विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button