पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा होणार हे स्पष्ट आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचीही स्थापना मुख्य मंदिरातच होणार आहे. पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडीत सलग दुसऱ्या वर्षी मांडव उभा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवादरम्यान मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकर्ते दहा दिवस मंदिरात जाणार नाहीत. ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरबसल्या गणेश भक्तांना दगडूशेठ गणपतीचं दर्शन मिळणार आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं हे १२९ वं वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात प्रवेश न करता भाविकांना बाहेरुनच दर्शन घेता येणार आहे. या काळात हार, फुले, पेढे आणि नारळ स्वीकारले जाणार नाहीत, असंही मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्यात गणेशोत्सवासाठी नियमावली
गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंधांचे सावट आहे. पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठा निर्णय
सप्टेंबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाविकांना गणपतीचे दर्शन घेता यावे यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामसह अन्य व्यासपीठांवर ऑनलाईन स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणपती मंडळांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्यावर्षी भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनाला मुकण्याची शक्यता होती.
त्यामुळे सर्व प्रतिष्ठित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गणपतीचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घेता येईल, यासाठी खास सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीच्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशमूर्ती या मंदिर आणि लहान मंडपात स्थापन करणार असल्याचेही सांगितले.