सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध गरजेचे : राजेश टोपे

मुंबई : राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागेलच, असे नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. राज्यातील लोक 15 दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला.
मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईसाठी राज्य सरकार कोणता वेगळा निर्णय घेणार का, असा प्रश्न राजेश टोपे यांना विचारण्यात आला. त्यावर राजेश टोपे यांनी मुंबईसाठी स्वतंत्र नियम होण्याची शक्यता नाकारली. मुंबईत लसीकरण मोठ्याप्रमाणावर होत आहे. तसेच याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असली तरी बेडसची कमतरता नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
आता कोरोनाबाधित तरुण अधिक
डॉ. तात्याराव लहाने यांनी राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, असं म्हटलं आहे. नवीन स्ट्रेनमुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन स्ट्रेनमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते , आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होतात. आधी 50 च्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत, असं लहाने म्हणाले.