आरोग्य

शरद पवारांनीही कोरोना लस घेतली

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली. काहीवेळापूर्वीच ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

जे.जे. रुग्णालयात पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लसीच्या सुरक्षिततेतविषयी खात्री नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेत लस टोचून घेतली होती. मात्र, त्यानंतरही रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ठिकाणचे कर्मचारी कोव्हॅक्सिन लस घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील कोरोना लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु होती. मात्र, आता शरद पवार यांनी जे.जे. रुग्णालयात येऊन कोरोना लस घेतल्याचे लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील लसीकरण मोहीम वेग पकडू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button