नवी दिल्ली : रणजी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणारा क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्या घरामध्ये घुसून कुटुंबावरच हल्ला करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमधील धुमा येथे अमित याच्या घरा शेजारी राहणाऱ्या तरुणांनी रॉड, फावडे आणि लाठ्या-काठ्यांनी अमित मिश्राचे आई-वडील, छोटा भाऊ, गर्भवती वहिनी, लहान पुतण्यांबरोबर पत्नी आणि मुलांनाही मारहाण केलीय. यापैकी अनेकजण गंभीर जखमी असून त्यांना अपोलो रुग्णालयामध्ये तसेच सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका किरकोळ वादावरुन ही धक्कादायक घटना घडली आहे.
सरकंडा येथील कृष्णा विहार कॉलिनीमधील निवासी असणारे रणजीपटू अमित मिश्रा यांचे शेजारी गंगाधर मिश्रा हे त्यांच्या घराची डागडुजी करत आहेत. सोमवारी सकाळी गंगाधर मिश्रा आणि अमित मिश्राचे वडील चंद्रिका प्रसाद यांच्यात वाद झाला. गंगाधर यांनी चंद्रिका यांना तुमच्या घराच्या बाजूने असणाऱ्या भागामध्ये थोडी डागडुजी करायची आहे असं सांगितलं. त्यावर चंद्रिका यांनी आमची सकाळची पूजा आणि घरातील कामं झाल्यानंतर काम सुरू करा असं सांगितलं. त्यामुळे गंगाधर मिश्रा प्रचंड संतापले असा आरोप करण्यात आला आहे. तसेच गंगाधर यांच्यासह त्यांचा भाऊ, दोन मुलं आणि अन्य व्यक्ती अचानक चंद्रिका मिश्रा यांच्या घरात घुसले आणि कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यामध्ये चंद्रिका यांच्याबरोबरच शशी, प्रतिमा, हितेश, मंजू, अलका हे घरातील सदस्यही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सरकंडा पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
अमित मिश्राच्या घरावर शेजाऱ्यांनी हल्ला केला तेव्हा तो अहमदाबादमध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट कॅम्पमध्ये सराव करत होता. नातेवाईकांनी फोन करुन त्याला धक्कादायक घटनेची माहिती दिली. याबाबत समजताच अमित बिलासपूरला रवाना झाला. या जीवघेण्या हल्ल्यात गर्भवती महिलेसह कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. कुटुंबातील नातेवाईकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहे.