गोमूत्र प्राशन केल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही : प्रज्ञासिंह ठाकूर
भोपाळ : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचं आवाहन केलं आहे. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
संत नगरमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला २५ ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे अजब विधान केलं. देशी गाय पाळण्याचं त्यांनी आवाहन केलं. तसेच एक कोटी वृक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संकटाच्या प्रसंगी सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. कोरोनाशी संबंधित गाईडलाईन सर्वांनी पाळली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावं लागलं होतं.