संजय राऊतांवर महिलेने केलेल्या गंभीर आरोपांची कोर्टाकडून दखल, लक्ष घालण्याच्या पोलीस आयुक्तांना सूचना
मुंबई : मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं प्रकरण आता राऊत यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण थेट कोर्टानं याची दखल घेतली असून मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. तसंच २४ जूनरोजी याप्रकरणाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यानुसार तक्रारदार महिलेवर पाळत ठेवल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी यात लक्ष घालून तक्रारीचं निवारण करावं आणि २४ जून रोजी यासंबंधिचा सद्य स्थितीचा अहवाल सादर करावा, असं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
संजय राऊत गेल्या सात वर्षांपासून आपला छळ करत असून माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली होती, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं असे अनेक गंभीर आरोप मुंबईतील एका मानसोपचार तज्ज्ञ महिलेनं केले आहेत. याप्रकरणी संबंधित महिलेनं मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये मुंबई पोलिसांना देखील प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. त्याचआधारे हायकोर्टानं आता थेट मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणात तक्रारीचं निवारण करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, भाजपचे नेते निलेश राणे यांनी कोर्टाच्या आदेशानंतर संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी एक ट्विट करुन राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. कोर्टानं संजय राऊतांच्या प्रकरणात दिलेले आदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो. कारण माध्यमं हे वृत्त दाखवत नाहीत. संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊतांच्या जाचाला सामोरी जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला कोणतंही कारण नसताना अटक देखील करण्यात आली होती. राऊतांची तिच्या आयुष्याची वाट लावली आहे, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.