मृत्यूदराच्या पारदर्शकतेसाठी कोरोना बळीचे ऑडिट आवश्यक : डॉ. गुलेरिया
नवी दिल्ली : पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालयांनी आणि राज्यांनी कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंचं ऑडिट केलं पाहिजे, असं मत एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं. कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी रणनिती बनवताना भारताच्या प्रयत्नांमध्ये रुग्णालये आणि राज्यांकडून कोविडशी संबंधित मृत्यूंची चुकीच्या माहितीमुळे समस्या निर्माण होतील. अशा परिस्थितीत कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूदराची पारदर्शकता आणण्यासाठी त्याचं ऑडिट केलं जावं, असं ते म्हणाले.
काही राज्य सरकारांनी मृत्यूचे आकडे लपवल्याचे आरोप करणारे काही रिपोर्ट्स काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. यादरम्यानच त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. गुलेरिया यांनी यावर भाष्य केलं. असं माना की एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला, परंतु त्याला कोरोना असेल, तर हृदयविकाराच्या झटक्याचं कारण कोरोनाही असू शकतो. याचाच अर्थ नॉन कोविडमध्ये त्याच्या मृत्यूची नोंद हे चुकीचं ठरू शकतं. कारण याकडे थेट कोविड ऐवजी केवळ तुम्ही हृदयाच्या समस्येच्या रुपात पाहत आहात, असं गुलेरिया म्हणाले.
रुग्णालये आणि राज्यांना कोविड डेथ ऑडिट करणं आवश्यक आहे. मृत्यूदराचं कारण काय आणि आपला मृत्यूदर कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे स्पष्ट आकडेवारी नसेल, तोपर्यंत आपण मृत्यूदर कमी करण्याची रणनिती विकसित करू शकणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.