लहान मुलांना कोरोना लसीचा निर्णय लांबणीवर

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच लहान मुलांसाठीच्या लशीची डोस कधी दिले जातील, याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (एनटीएजीआय) ने लहान मुलांना लस देण्याबाबत कोणतीही शिफारस केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना लसीकरणाला देशभरात वेग आला आहे. १८ वर्षावरील वयोगटातील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. एकीकडे शाळांची दार उघडी केली जात आहे पण अद्यापही लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आज नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या या बैठकीत मुलांसाठी अतिरिक्त कोविड डोस आणि लस याबाबत कोणतीही अंतिम शिफारस करण्यात आली नाही, अशी माहिती एनआयए वृत्तसंस्थेनं दिली आहे.
दरम्यान, भारत बायोटेक कंपनीकडून लहान मुलांसाठीची लस तयार करण्यात आली आहे. २ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस तयार आहे. या लसीच्या पहिल्या तीनही टप्प्यांच्या चाचण्या पार पडल्या असून शेवटची औपचारिकता बाकी आहे. मात्र लहान मुलांसाठीची ही लस असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता सर्व निकषांची वारंवार खातरजमा केल्यानंतरच या लसीला लहान मुलांवर वापर करण्यासाठी परवानगी देण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. कोव्हॅक्सिनकडून या लसीबाबत सादर करण्यात आलेला डेटा तपासण्याचं आणि त्याचं पृथक्करण करण्याचं काम सध्या सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर लशीच्या वापराला परवानगी मिळू शकणार आहे. पण याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.