राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; २४ तासांत ६७ हजार नवे रुग्ण
मुंबई : राज्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. आता या लॉकडाऊनचा परिणाम कितपत होईल हे लवकरच समजेल. दरम्यान गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. असले तरी बाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होताना दिसत आहे. केवळ बाधितांच्या संख्येतच नाही तर मृतकांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आरोग्य यंत्रणेवर भार पडत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत (२१ आणि २२ एप्रिल) तब्बल १ लाख ३४ हजार ४८१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गुरुवारी नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू, यवतमाळ- २२, रायगड- १६, नागपूर- १३, नांदेड- ९, नाशिक- ८, औरंगाबाद- ७, परभणी- ५, सोलापूर- ४, ठाणे- ४, वर्धा- ४, अहमदनगर- ३, कोल्हापूर- २, जळगाव- १, नंदूरबार- १, पुणे- १ आणि सातारा- १ असे आहेत. तसेच आज दिवसभरात ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के एवढा आहे. २१ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती तर गुरुवारी, २२ एप्रिल रोजी पुन्हा ५६८ मृत्यूची नोंद झाली आहे. बाधित रुग्णांच्या सोबतच मृतकांच्या संख्येत होणारी वाढ ही निश्चितच चिंतेत भर टाकणारी आहे.
राज्यात कडक निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. यानुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. तर इतर नागरिक वैद्यकीय, अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडू शकतात. प्रवासी वाहतूक बंद असणार आहे. बस सेवा आणि लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.