सोलापूर : देशात कोरोनानं थैमान घातलेलं असतानाही निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोट निवडणूक घोषित केली. त्याचे परिणाम आता दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. येथील नागरिकांना ही निवडणूक भलतीच महागात पडली आहे. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता निवडणूक कर्तव्य बजावलेल्या एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या निवडणुकीत नेमणूक झालेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्ग झाला. यात या शिक्षकासह त्यांचे वडील, आई आणि मावशीलाही जीव गमवावा लागलाय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त होत राहिलंय. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संतापही व्यक्त केला. या निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. निवडणुकीनंतर आता ही भीती सत्यात उतरलीय.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात रोज कोरोना बाधितांचे आकडे बेसुमार वाढत आहेत. यात रोज अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाचे नवे रुग्ण दोन्ही तालुक्यात वाढत असताना सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक कर्तव्यावर गेलेल्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली. इतकंच नाही तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही दगावल्या.
सांगोला तालुक्यातील घेरडी गावाचे शिक्षक प्रमोद माने यांची निवडणूक कामावर नेमणूक झाली होती. कुठल्याही परिस्थितीत हे काम टाळता येत नाही. निवडणुकीचे काम संपवून घरी गेल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी सांगोला येथे दाखल केले, पण त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डॉक्टर असलेल्या त्यांच्या बंधूनी त्यांना मुंबईला हलवलं, पण अखेर प्रमोद माने यांचा कोरोनाने बळी घेतला.
कोरोनाने निवडणूक कामावर असलेल्या प्रमोद माने यांचा बळी घेतल्यानंतर हे दृष्टचक्र इथंच थांबलं नाही. त्यांच्यानंतर त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रमोद माने यांच्या मुलाने आणि पत्नीने मात्र कोरोनाशी यशस्वी झुंज दिली आणि बरे झाले.