मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने शालेय शिक्षण विभागाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये आजपासून शाळा सुरू होत आहे. शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये राज्यातील जवळपास ५ लाख ६० हजार ८१९ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंद असलेल्या शाळा कोेरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, दुसरी लाट आल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. आता दुसरी लाट ओसरल्यानंतर कोविडमुक्त ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार १५ जुलैपासून कोविडमुक्त ग्रामीण भागामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येत आहे. शाळा सुरू करताना शासनाच्या कार्य पद्धतीचे काटेकोरपणाने पालन करण्याकडे लक्ष दिले जात आहे.
एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, कोरोना चाचणी करून घेणे या नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था गावात करण्याची किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबतच्या सूचनाही शिक्षकांना दिल्या आहेत. शिक्षकांची कोविडबाबतची चाचणी करण्यात येत आहेत.