देशात कोरोनाचा महाविस्फोट; रुग्णवाढीचा नवा उच्चांक, २४ तासांत ७९४ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता इतकी भयंकर आहे की, गेल्या काही दिवसातच १० लाखापेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अॅक्टिव रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांचाही आकडा वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार गेल्या २४ तासात देशात एकून १ लाख ४५ हजार ३८४ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. दरम्यान, ७७ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत, तर ७९४ लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, खडबडून जागं करणारेच आकडे समोर आले आहेत. देशात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले असून, जवळपास ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि करोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.