मुंबई: आघाडीतील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही समिती काम करेल. ही समिती एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती. काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे एकमेकांचे कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलं होतं. मात्र, हा गोंधळ अधिक वाढू नये म्हणून अखेर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या समितीत असणार आहेत. हे तिन्ही नेते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश देतांना एकमेकांना विश्वासात घेणार आहेत. एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.