
नागपूर : आशिष देशमुख यांना पक्षाची नोटीस, पक्ष विरोधी कारवाया बघता पक्षातून का काढू नये यासाठी त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ७ दिवसात उत्तर द्यायला सांगितले असून, ते न आल्यास काही म्हणणे नाही असे समजून बडतर्फ केले जाईल असे पत्रात नमूद केले आहे.
काँगेसमधील अंतर्गत वादातून आशिष देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावर आरोप केले आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी अशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतांना खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप अशिष देशमुख यांनी केला आहे.
मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हाबँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता. आज १९,२० वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती त्या ठीकाणी केली. ॲड. आसिफ कुरेशी हे महाराष्ट काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली होती.
बेईमानी केली तर दोन लाथा घाला; सुनील केदार यांचे वक्तव्य
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी नागपूर काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत राज्याचे दुग्ध आणि पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बेईमानी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा घाला असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. हे वक्तव्य आशिष देशमुख यांनी उद्देशून होते. त्यावेळी आशिष देशमुख भाजप उमेदवाराचा जाहीर प्रचार करत होते.
कितीही मोठा नेता असून द्या जो जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत काँग्रेससोबत बेईमानी करेल त्या नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा मारा, पोलीस केसेस मी बघून घेईल.. वेळ आली तर मी मंत्रिपद बाजुला ठेवेल मी पण पुढे येईल असं वक्तव्य मंत्री सुनील केदार यांनी नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले होते. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बँक घोटाळ्याच्या संदर्भात कारवाई करण्याचं म्हटलं होतं. या पत्रात देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार केल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे.
आशिष देशमुख हे २०१४ मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका असून काका-पुतण्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आशिष देशमुखांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत.




