राजकारण

भाजपकडून १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर; झारखंडमधील काँग्रेस आमदाराचा दावा

रांची: गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब करणारी माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. यानंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी आपल्याला १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा काँग्रेसच्या आमदाराने केला आहे. आमदारांचा घोडेबाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोलेबिरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कोंगारी यांनी आपल्यालाही सरकार पाडण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती, असा दावा एका वृत्तपत्राशी बोलताना केल्याची माहिती मिळाली आहे. झारखंडमध्ये आताच्या घडीला झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद या तिन्ही पक्षांचे सरकार आहे. ते तीन जण माझ्यापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पोहोचले होते. काही कंपन्यांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते, असे काँग्रेस आमदाराने म्हटले आहे.

त्या तिघांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केले. पण ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने संपर्कात यायचे. एकदा तर त्यांनी मला रोख १ कोटींची ऑफर दिली. ही ऑफर आल्यानंतर लागलीच हे सगळे पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंह यांच्या कानावर घातले. याबद्दल मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही माहिती दिली होती, असे आमदार कोंगारी यांनी सांगितले. दरम्यान, यावर काँग्रेस पक्षाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपकडून या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button