Top Newsराजकारण

२ फेब्रुवारीला मंत्र्याचे एक, ७ फेब्रुवारीला दुसरेच; काँग्रेस नेत्यांकडून मोदींच्या दाव्याची पोलखोल

नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरविल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असं मोदी म्हणाले. यावरून आता कांग्रेसनं मोदींवर निशाणा साधला.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रमिक ट्रेन चालवल्या आणि ६३ लाख श्रमिकांना घरी पोहोचवण्याचं काम केल्याचं मोदी सरकारमधील मंत्री बोलत असल्याचं दिसत आहे. हा दावा त्यांनी २ फेब्रुवारी रोजी संसदेत केल्याचंही श्रीनिवास बी. व्ही. यांनी म्हटलं आहे.

रेल्वे आम्ही सुरु केल्या होत्या का?; नाना पटोलेंचा मोदींना सवाल

देशात कोरोना काँग्रेसने पसरविल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. यावर आता काँग्रेसकडून प्रत्यूत्तरे सुरु झाली आहेत. गोव्यात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना काळात मोदींनी देशाला वाऱ्यावर सोडले होते. लोकांना अन्न, जाण्यासाठी वाहने नव्हती. मोदींना काय वाटत होते? असा सवाल केला. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींनी आपले पाप झाकण्यासाठी काँग्रेसचे नाव घेतल्याचा आरोप केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत डब्ल्यूएचओने सांगितलेले जर पाळले असते तर देशावर ही परिस्थिती आली नसती. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ते पाप झाकण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी यांनी केला, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले. मोदी दरवेळी काँग्रेसचे नाव घेतात आणि निवडून येतात, असे किती दिवस चालणार? असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्र काँग्रेसने युपी, बिहारच्या लोकांना तिकिटे काढून दिली, मुंबई रेल्वे स्थानकावर गर्दी जमा केली, यामुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप मोदी यांनी केला. यावर देखील पटोले यांनी उत्तर दिले आहे. देशात रेल्वे कोणी सुरु केल्या? त्या काँग्रेसने केल्या का? मोदी किती खोटे बोलत आहेत, हे दिसतेय असे प्रत्यूत्तर देत युपीतील मृत्यू लपविण्यासाठी काँग्रेसचा वापर केला जात असल्याचे पटोले म्हणाले.

पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर लोकसभेत उत्तर देत होते.

मोदींचं मजुरांबाबतचं वक्तव्य म्हणजे हृदयशून्यतेचे उदाहरण

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलताना काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. त्यानंतर आता राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासकरून मोदींच्या भाषणातल्या परप्रांतीय मजुरांना पाठवण्याच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य म्हणजे दुर्दैवी आहे. त्यांच्या पदाला शोभणार नाही, ज्यावेळेस करूनचे संकट होते, त्यावेळेला लाखोच्या संख्येने परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात होते. आम्ही महाविकास आघाडी असो अथवा काँग्रेसच्या वतीने असो आम्ही या सर्वांची महाराष्ट्रात काळजी घेतली. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली . त्यांचे तिकीट काढून दिली त्यांची काळजी घेतली ही वस्तुस्थिती आहे. याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं असतं तर आम्हालाही बर वाटलं असतं असा टोला महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने लॉकडाऊनमध्ये मजुरांना तिकीट काढून ट्रेनमध्ये बसवले आणि घरी पाठवल्याने कोरोनाचा प्रसार केला, असा आरोप केला आहे, त्यावर बोलताना असा आरोप हा मोदी सरकारच्या असंवेदनशीलता आणि हृदयशून्यतेचे उदाहरण आहे. मोदी सरकारच्या या निगरगट्ट पणाचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दात सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर पंतप्रधान मोदी स्वत:चं अपयश झाकण्याकरता कॉग्रेसवर खापर फोडत आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत. कॉग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते. उलट कॉग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे. रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता. रेल्वे तुम्हीच सुरु केलीत. कोरोना नियंत्रणात करता आला नाही हे पाप झाकण्याकरता हे आरोप केले जाता आहे, असी टीकाही त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक जास्त आहेत. असंवेदनशिलतेची हद्द मोदींनी पार केलीय. असेही पटोले म्हणाले आहेत.

हार समोर दिसत असल्यामुळे हे डावपेच

लॉकडाऊन सुरु केलं तेव्हा रेल्वे, बस बंद केल्या होत्या. भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं तेव्हा जे लोकांचे हाल झाले तेच हाल लॉकडाऊन मध्ये झाले. महिनाभर लोकांकडे रोजगार नव्हता, पैसे नव्हते. त्यावेळी माणूसकीचं जे नातं जोपासायला हवं होतं ते कॉग्रेसनं निभावलं. काँग्रेसने कोणत्याही मजुरांचा रोजगार हिरावून घेतला नाही तर त्या सर्वांची काळजी कोरोनाकाळात घेतली आहे. देशात कोरोना मृत्युचं तांडव जे पहायला मिळालं ते मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे पहायला मिळालं, असा आरोपही पटोलेंनी केला आहे. भाजप उत्तर प्रदेशमध्ये 5 राज्यांच्या निवडणुकीत पराभूत होतंय. त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप लावले जात आहेत. नरेंद्र मोदींचे राजकीय डावपेच हे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाहायला मिळतात. मात्र जनतेला आता सगळं कळून चुकलेले आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

मोदींचे विधान बेजाबदार आणि हास्यास्पद, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसमुळे कोरोना पसरला, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्याचे हे विधान अत्यंत बेजाबदार आणि हास्यास्पद आहे, असा पलटवार काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत भाषण केलं. या भाषणावर विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आज धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप केला. त्यांच्या आरोपाला अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले. पंतप्रधान सारख्या एखाद्या जबाबदार व्यक्तीने असे हास्यास्पद आणि बेजाबदार वक्तव्य करणे, हे निश्चितच न शोभणारे आहे, असं म्हणावे लागले. जर देशात काँग्रेसने कोरोना पसरवला असेल तर भारतात कोरोना कुणी आणला हा प्रश्न आहे, असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थितीत केला.

कोरोना हा जागतिक महामारीची विषय आहे. हे काही एखाद्या राज्य आणि देशापुरते मर्यादीत नाही. कोरोनाची महामारीची मुकाबला करण्याचा काळ आहे. राज्य सरकारने कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण आणले. केवळ पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टीका करणे हे अत्यंत बेजाबदारपणाचे लक्षण आहे. पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने केले हे वक्तव्य अत्यंत बेजाबदारपणाचे आहे. केंद्राचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसवर आरोप करत आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button