Top Newsराजकारण

आघाडीतील सुंदोपसुंदीवर चर्चा? काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू आहेत. त्यामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्रं असतानाच काँग्रेस नेत्यांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे सुद्धा पवारांच्या भेटीला आल्याने या भेटीत महाविकास आघाडीतील कुरबुरीवर चर्चा झाल्याची चर्चा अधिक रंगली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज संध्याकाळी पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरीवर चर्चा केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याशिवाय केंद्र सरकारने नवं सहकार खातं निर्माण केलं आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

काँग्रेसचे प्रभारी आणि राज्यातील नेत्यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोबत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कालच पवारांनी नाना पटोलेंवर टीका केली होती. लहान नेत्यांवर मी बोलत नाही, असं पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळेच पटोले यांनी पवारांच्या भेटीला जाण्याचं टाळल्याचं बोललं जात आहे.

या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. राज्य सरकारने विधानसभेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ठराव मंजूर केले आहेत. हे ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यावरही अशोक चव्हाण यांनी पवारांचा सल्ला घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button