राजकारण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसचे ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान

पुण्यातील टिळक वाड्यातून उद्या प्रारंभ

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. १ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळकवाड्यातून या अभियानाची सुरुवात होत असून १५ ऑगस्टपर्यंत व त्यानंतर पुढे वर्षभर हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे योगदान नव्या पिढीसमोर मांडले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात पटोले म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. काँग्रेसच्या छताखाली अख्खा देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकारविरोधात उभा राहिला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली विविध माध्यमातून ब्रिटीश सरकारला जेरीस आणले. या संघर्षात हजारो लोकांनी बलिदान दिले, अनेकांना इंग्रज शासनाचे अनन्वीत जुलुम, अत्याचार सहन करावे लागले, लाठ्या काठ्या अंगावर घेतल्या, हजारोंना तुरुंगात डांबले गेले पण स्वातंत्र्यासाठी कुठलीही तडजोड केली नाही. स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने भरीव कामगिरी केली म्हणूनच जगात देश आज ताठ मानने उभा आहे परंतु काही लोक काँग्रेस, गांधी, नेहरु कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करत आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे योगदान नाकारता येणार नाही.

या अभियानाची सुरुवात करताना पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या घराण्यांच्या वारसांना बोलावले जाणार आहे. राज्यातील १५ हजारांपेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांच्या भागात गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक अशा महत्वाच्या, ऐतिहासिक ठिकाणी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

पहिल्या टप्यात १ तारखेला पुण्यात कार्यक्रम होईल त्यानंतर ७ ऑगस्टला सकाळी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करुन स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यचळवळीत चिमठाणा जिल्हा धुळे येथे ब्रिटिशांचा खजिना लुटला होता त्या जंगलात दुपारी ४ वाजता कार्यक्रम होणार आहे, मशाल मोर्चा काढला जाईल. शिरिषकुमार मेहता या १४ वर्षांच्या तरुणाने स्वातंत्र्यासाठी इंग्रजांचा गोळ्या झेलल्या त्याच्या स्मरणार्थ नंदुरबार येथे ८ ऑगस्टला सकाळी एक कार्यक्रम होईल. त्यानंतर नाशिक येथे दुपारी ४ वाजता थोर क्रांतीकारक अनंत कान्हेरे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होईल आणि ९ ऑगस्टला मुंबईतील गवालिया टँक येथे एक कार्यक्रम संपन्न होत आहे.

या अभियानासाठी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व विनायक देशमुख यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button