गडचिरोली : शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करीत नाना पटोले यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंना त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढल्या पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्ली होते. मात्र ,आता ते नागपूर-भंडारा या भागात आल्याची माहिती नाही, अशा शब्दात पवारांनी नाना पटोलेंना जोरदार टोला लगावलाय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर चालणारे पक्ष आहेत. सहकारी पक्षांबाबत बोलताना भान ठेवला पाहिजे. नाना पटोलेंनी लोकसभा आणि विधानसभा कशी जिंकली? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या विचारांना तेथूनच प्रेरणा मिळालेली दिसते. ही विचारधारा अफवा आणि गैरसमज निर्माण करणारी आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील अमरावती आणि मालेगावात झालेल्या आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचारावर शरद पवारांनी भाष्य केलं. त्रिपुरात काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत उमटावी, असं मला वाटत नाही. राज्यात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झालाय. या प्रकरणाद्वारे समाजासमाजात विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न झाला, असंही पवारांनी यावेळी म्हटलं होतं.