राजकारण

देगलूरमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय

देगलूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला झटका देत विजय मिळवू असा दावा भाजपकडून केला जात होता. मात्र, देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना १ लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांना ४१ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं ही पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. तर भाजपकडूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.

उमेदवारांना मिळालेली मते

– जितेश अंतापूरकर – १ लाख ८ हजार ७८९
– सुभाष साबणे – ६६ हजार ८७२
– उत्तम इंगोले – ११ हजार ३४७
– विवेक सोनकांबळे – ४६५

टपाली मतदानातही अंतापूरकरांना आघाडी

टपाली मतदानातही जितेश अंतापूरकर यांना ५१ मतं मिळाली. तर सुभाष साबणे यांना ३५, उत्तम इंगोले यांना १ तर विवेक सोनकांबळे यांना २ मतं मिळाली. तर १ हजार १०३ मतदारांना नोटाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.

देगलूरचा विजय महाविकास आघाडी सरकारवरचा विश्वास दृढ करणारा : पटोले

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय हा काँग्रेस पक्षावरचा जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. हा विजय महाविकास आघाडी सरकारवरच्या कामाला जनतेने दिलेली पोचपावती आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्यासह स्थानिक जनता व काँग्रेस कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल मनापासूनच धन्यवाद, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पटोले म्हणाले की, देगलूरची जागा काँग्रेस पक्षाचीच होती पोटनिवडणुकीत ही जागा अधिक मताधिक्क्याने कायम राखली. विरोधीपक्ष भाजपाला या मतदारसंघात उमेदवारही मिळाला नाही, त्यांनी नेहमीप्रमाणे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बळजबरीने उभा केला पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. महाविकास आघाडी सरकार या निकालाने अधिक सक्षम झाले आहे. दोन वर्षात मविआ सरकारने केलेल्या कामाची ही पोचपावती असून महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपा व त्यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता कंटाळलेली आहे हेच यावरून दिसते. देगलूरच्या जनतेने ‘तथाकथीत लाट’ वा ‘पॅटर्न’ चालत नाही हे दाखवून दिले.

देगलूरसह देशभरात झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेस पक्षाने यशाची पताका फडकावत ठेवली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक झाली, या चारही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर राजस्थान, कर्नाटक येथील जागांवरही काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुन्हा यशस्वी मार्गक्रमण करत आहे. मोदी नावाची कोणतीही लाट देशात नसून तो एक बागुलबुवा आहे. या बागुलबुवाची भीती बाळगण्याचे कारण नाही. तृणमुल काँग्रेसनेही पश्चिम बंगालमध्ये भाजपाला नेस्तनाबूत केले तर दादरा नगरहवेलीत शिवसेनेने भाजपाला धक्का देत लोकसभा पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय हा विरोध पक्षांची वाढती ताकद व भाजपाला जागा दाखवणारा आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांना संपवण्याचे काम करणाऱ्यांना, प्रचंड वाढत्या महागाईकडे, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांकडे, वाढत्या बेरोजगारीकडे दुर्लक्ष करुन जाती-धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे, असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button