विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली असून त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सभागगृहाच्या बाहेर एकीकडे काँग्रेस आमदार केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत असताना दुसरीकडे भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. काँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदार आमने-सामने आले.
इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस आमदार सायकलवरुन विधानभवानाकडे रवाना झाले. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना म्हटलं की, “केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्दतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात विरोध होत आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे भाव वाढल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जो प्रयत्न सुरु आहे, लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचं काम सुरु केलं आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत”.
“विरोधक इंधन दरवाढीसंबंधी खोटी माहिती पसरवत आहेत. केंद्राने आपलं विश्लेषण जनतेसमोर मांडावं असं असताना पेट्रोलियम मंत्री थंडीमुळे वाढल्याचं सांगत आहेत,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.