राजकारणात चुका होत असतात. त्याची कबुली देणं हा मनाचा मोठेपणा झाला; परंतु एक-दोन चुका असत्या, तर लोकांनी त्या मोठेपणानं माफही केल्या असत्या. राहुल गांधी यांनी स्वतःच्या चुका मान्य करण्याबरोबरच आजीच्या चुकांचीही माफी मागायला सुुरुवात केली आहे. पक्ष सैरभैर झाला असताना नेत्यानं अशा चुकांची किती वेळा कबुली द्यायची आणि त्यानं काय साध्य होणार, हा खरा प्रश्न आहे.
गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दोनदा चुका मान्य केल्या आणि त्याची माफीही मागितली. भाजपनं त्यावर तिरकस टीका केली असली, तरी चुका मान्य करणं हे मनाचं मोठेपणं असतं. भाजपाईला ते कळणार नाही; परंतु राहुल यांनी किती चुका केल्या आणि त्याची कितीही वेळा माफी मागितली, तरी त्याचा काय उपयोग हा प्रश्न उरतोच. हातात असतं, तेव्हा चूक सुधारायची नाही आणि हातातून सर्व गेलं, की मग चूक मान्य करायची, याला काहीही अर्थ नसतो. राहुल यांनी स्वतः च्या चुका मान्य करून कारभार केला, तर त्याला कोणाचाही हस्तक्षेप असायचं कारण नाही; परंतु उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर ती चूक होती, असं म्हणण्याचा राहुल यांना अधिकार आहे का, हा खरा प्रश्न आहे. राहुल यांनी पक्षात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पक्षात युवा नेतृत्वाला संधी दिली, हे चांगलंच केलं; परंतु जेव्हा सत्ता द्यायची वेळ आली, तेव्हा मात्र युवकांवर विश्वास दाखविला नाही. कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश या राज्यातील सत्ता केवळ आमदारांना भेट न दिल्यानं गेली. राजस्थान अजून हातात असलं, तरी सचिन पायलट यांची तिथं काय अवस्था करून ठेवली आहे, हे पाहिलं, तर राहुल यांना ज्येष्ठ आणि युवकांत दुवा सांधता आलेला नाही, हे स्पष्ट होतं. काँग्रेसमध्ये तरुणांवर खूप जास्त लक्ष्य केंद्रित करणं ही आपली चूक असल्याचं राहुल एकीकडं म्हणतात आणि दुसरीकडं ज्योतिरादित्य शिंदे यांना पायघड्या घालायला लागतात, हे चित्र परस्परविरोधी आहे. काँग्रेसनं ज्येष्ठांच्या नादी लागूनच युवा नेतृत्व उदयाला येऊ दिलं नाही. त्यामुळं जी पिढी राजीव गांधी यांनी काँग्रेसशी जोडली होती, ती राहुल यांच्या काळात भाजपकडं अलगद गेली.
राहुल यांनी राजकारणात विश्वास, निष्ठा आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिला. त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधिल लोकांना अधिक महत्त्व देण्याचा सूचक इशारा दिला. काँग्रेसचं नेतृत्व करण्याची राहुल यांची एकीकडं तयारी सुरू असताना त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठांना सांभाळून घेण्याचं सूतोवाच केलं. दुसरीकडं जे 23 नेते पक्षाच्या बांधणीविषयी बोलतात, त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची खेळी काय नेते करीत आहेत. ज्यांचं नाव पक्षाच्या अध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं, ते अशोक गेहलोत त्यापैकीच एक. खरंतर ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन तरुणांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं, तरच काँग्रेसला काहीतरी भवितव्य आहे; परंतु राहुल काळाची पावलं उलटी फिरवायला निघाले आहेत. राहुल यांनी दिलेल्या इशार्यानुसार आता आगामी काळात ते काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठावान असणार्यांनाच प्राधान्य देणार असं दिसतंय. त्यात काहीच वावगं नाही; परंतु याचा अर्थ युवकांना बॅकफुटवर ढकलावं असं नाही. मध्यंतरीच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या युवा नेत्यांच्या बंडखोरीनंतर राहुल यांनी आपला पवित्रा बदलल्याची चर्चा आहे; मात्र त्याला ज्योतिरादित्य, सचिन पायलट यांच्यापेक्षा राहुलच जास्त जबाबदार आहेत. पक्षात अधिकाराचं विकेंद्रीकरण करावं लागतं. केंद्रीकरण करून कारभार पाहण्याइतकी त्यांची पकड नाही. ज्योतिरादित्य यांना मुख्यमंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षप दिलं असतं, तर मध्य प्रदेश हाततून गेलं नसतं. सचिन पायलट यांनी पक्षाला सत्तेत आणलं आणि त्यांचा गेहलोत यांनी कचरा करून टाकला. पायलट यांना राहुल न्याय देऊ शकले नाहीत. विश्वासावर राजकारण चालतं, हे खरं असलं, तरी हा विश्वास नेत्यांनी द्यायचा असतो. तोच मिळाला नाही, की मग अनेक ज्योतिरादित्य तयार होतात. ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये असते तर ते आता मुख्यमंत्री झाले असते, असं सांगणार्या राहुल यांनी कमलनाथ यांच्याऐवजी ज्योतीरादित्य यांच्याकडं मुख्यमंत्रिपद आणि कमलनाथ यांच्याकडं प्रदेशाध्यक्षपद सोपविलं असतं, तर काँग्रेस आणखी मजबूत झाली असती, हे लक्षात घेतलं नाही. आता शिंदे यांना भाजपमध्ये शेवटच्या बाकांवर बसावं लागतंय, असं राहुल म्हणाले असले, तरी त्यात मित्रप्रेम किती आणि खोचक टीका किती, याचा विचार केला पाहिजे. ज्योतिरादित्य यांच्याकडं काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बळकट करण्याचा पर्याय होता. तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, हे आपण त्यांना बोललो होतो; पण त्यांनी दुसरा मार्ग निवडला, असं राहुल यांचं म्हणणंही अर्धसत्य आहे. त्याचं कारण ज्योतिरादित्यही प्रदेशाध्यक्ष सांभाळायला तयार होते; परंतु कमलनाथ यांच्याकडून ते पद काढून घेण्याची हिंमत राहुल दाखवू शकले नाहीत. दिग्विजय आणि कमलनाथ यांनी पक्षाचं वाटोळं केलं, तरी त्यांच्यावरच राहुल यांचा जास्त विश्वास. ज्योतिरादित्य हे काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांपैकी एक होते. जवळपास 18 वर्षे त्यांनी काँग्रेससाठी काम केलं. आपण काँग्रेस का सोडतोय, याचं कारणही ज्योतिरादित्य यांनी त्या वेळी दिलं होतं. राहुल यांना आता जेवढी काळजी आहे, तेवढी त्यांनी त्या वेळी करायला हवी होती, जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. या पेक्षा अधिक मला काही बोलण्याची गरज वाटत नाही, असं म्हणत ज्योतिरादित्य यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिलं आहे.