महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये येथे येऊन दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस केली. त्यांचं सांत्वन केलं. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. या दुर्घटनेत काही लोक वाचले. ते कामाला गेले होते म्हणून वाचले. तर अजूनही २६-२७ जण बेपत्ता आहेत. माझे वडील गायब आहे. मी खूप लांबून आलोय. एक जण तर हिमाचल प्रदेशातून आला आहे, असं एका तरुणाने मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तर, दुसऱ्या तरुणाने त्याची आई गायब असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच शेजारच्या गावातील लोकांनी खूप मदत केल्याचंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
‘साहेब, गेल्या दोन दिवसांपासून माझे वडील गायब आहेत… शोध शोध शोधलं पण सापडत नाहीत… मी खूप लांबून आलोय… काही तरी करा…’ असा टाहोच तळीये दुर्घटनाग्रस्तांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर फोडला. कुणी सांगितलं माझे वडील गायब आहेत. कुणी आई गायब असल्याचं सांगितलं. तर, कुणी आमचं अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं. तसेच राज्य सरकार तुमच्या पाठिशी उभं आहे, असं आश्वासनही या ग्रामस्थांना दिलं.
या दुर्घटनेनंतर लगेचच शासकीय यंत्रणा घटनास्थळी येईल अशी अपेक्षा होती. रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टर येईल असं वाटत होतं. पण कोणीच आलं नाही. आता आम्हाला लवकरात लवकर दिलासा द्या. आमचं पुनर्वसन करा. आमचा सरकारवर पूर्णपणे विश्वास आहे, असं सांगतानाच कोकणात जे लोक डोंगरात राहतात त्यांना दरडीची भीती असते. तर जे जमिनीवर राहतात त्यांना पाण्याची भीती असते, असंही या तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.
काळजी करू नका, फक्त स्वत:ला सावरा
मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना धीर दिला. परिस्थिती प्रचंड अवघड होती. भयानक स्थिती होती. सगळीकडे पाणी होतं. यंत्रणा लवकर पोहोचू शकली नाही. कालपासून आम्ही आर्मी आणि नेव्हीला पाठवलं होतं. पण पावसामुळे यंत्रणांना पोहोचता येत नव्हतं, असं सांगतानाच तुम्ही काळजी करू नका. तुमचं सर्वांचं पुनर्वसन केलं जाईल. तुमची कागदपत्रे गहाळ झालीत. त्याचीही चिंता करू नका, ते सर्व तुम्हाला मिळवून देऊ. तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या सर्व आम्ही करू. तुम्ही फक्त स्वत:ला सावरा. तुम्ही काहीच चिंता करू नका. सर्व गोष्टी सरकारवर सोडा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कागदपत्रांची चिंता करू नका
या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असंही त्यांनी सांगितलं.
डोंगरातील लोकांचं पुनर्वसन करणार
गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावं असं आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
त्यांना मृत घोषित करू
मागच्यावेळी प्रमाणे यावेळीही दुर्घटनेत गायब झालेल्या लोकांचा दोन दिवस शोध घेऊ. त्यानंतरही कोणी सापडलं नाही तर त्यांना मृत घोषित करू, असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे : दरेकर
मुख्यमंत्र्यांच्या तळिये दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सरकारने आता तरी जागं व्हावं. सरकारची बेफिकीरी हा चिंतेचा विषय आहे. लोकांना तातडीने मदत मिळणं गरजेचं असून त्यांचं स्थलांतर करणंही गरजेचं आहे, असं दरेकर म्हणाले.
फडणवीस दौरा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कोविड काळात जी दरी होती, ती आता नाहीये. केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत आहेत. हेलिकॉप्टर सोडण्यात आलं आहे. केंद्राकडून राज्याला पाहिजे ती मदत दिली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून स्वत: पूर आणि दरडग्रस्त भागांचा दौरा करणार आहे. यंत्रणा सक्रिय व्हाव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. लोकांचे जीव वाचले पाहिजेत, हाच आमचा हेतू आहे, असं ते म्हणाले.