राजकारण

मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करु शकतात पण…?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले. मुंबईत सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तथापि, यावरुन भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. या बैठकीत लोकल संदर्भात निर्णय होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत लोकलवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकल प्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा, असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अजून एक त्यांनी ट्विट केलं आहे. मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, असं उपाध्ये म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button