लोकजनशक्ती पार्टीची शकले; पासवान काका-पुतण्याकडून दोन नव्या पक्षाची स्थापना

नवी दिल्ली : लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. निवडणूक आयोगाने मूळ लोकजनशक्ती पक्षाचे बंगला हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. तर त्यांचे काका पशुपती पारस यांनीही नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या नव्या पक्षाचे नाव लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) असे असेल. तर त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हेलिकॉप्टर असेल. निवडणूक आयोगाने चिराग पासवान यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्हाला मान्यता दिली आहे. तर पशुपती पारस यांनाही पक्षाचे नवे नाव आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले आहे. पशुपती पारस यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी असेल. त्यांना शिलाई मशीन हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
लोकजनशक्ती पक्षावरून चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यात असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले होते. त्यानंतर दोघांनीही निवडणूक आयोगाकडे नवे नाव आणि चिन्हासाठी अर्ज केला होता. त्यात चिराग पासवान यांनी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) आणि हेलिकॉप्टर हे निवडणूक चिन्ह मागितले होते. तर पशुपती पारस यांना राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी हे नाव आणि शिलाई मशिन हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
बिहारमध्ये दोन विधानसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना वेगवेगळी नावे आणि निवडणूक चिन्हे पाठवण्यास सांगितले होते. यावर्षी जून महिन्यात लोकजनशक्ती पार्टीमध्ये घडलेल्या मोठ्या घडामोडींनंतर पशुपती पारस यांनी चिराग पासवान यांना पदावरून हटवून पक्षावर कब्जा केला होता. तेव्हापासून काका आणि पुतण्यामध्ये जोरदार राजकीय लढाई सुरू झाली होती.