राजकारण

एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग; फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई : संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोन टॅपिंगवरुन काँग्रेसनं जोरदार गोंधळ घातला. मोदी सरकारकडून राजकीय मंडळींसह अनेक क्षेत्रातील लोकांचे फोन टॅप केले जात अशल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय.

संसंदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी संधी दिली आहे. अशावेळी अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही मीडिया हाऊसेसनी पेगाससच्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय.

दरम्यान, संबंधित विभागानं अशा बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे. लवकरच सत्य काय ते समोर येईल. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंह यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन चॅपिंग केल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर जे काम झालं आहे ते कायदेशीर झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉड्रिंग रोखण्यासाठी फोन टॅप झाल्याचं सांगितलं. तसंच ते योग्य असल्याचं समर्थनही केलं होतं. त्याचबरोबर फोन टॅपिंगची बातमी येणं चुकीचं असल्याचं सांगत, याबाबत यापुढे काळजी घेऊ असंही ते म्हणाले होते. यूपीएच्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीररित्या योग्य आहे हे देखील सांगण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

पेगाससमध्ये ४५ देशांचा उल्लेख आहे. मात्र चर्चा फक्त भारताचीच केली जात आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे सगळं केलं जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केलाय. एक-दोन मीडिया हाऊसला चायनिज फंडिग येत आहे. त्याद्वारे एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत एनएसओच्या कोणत्याही यंत्रणा आम्ही वापरल्या नाहीत. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असं कधीही झालं नाही. काही परदेशी एजन्सी भारताला बदनाम करत आहेत. त्याचाच एक भाग आपण बनू नका, असं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केलं आहे.

आपल्याकडे टेलिग्राफ अ‍ॅक्ट आहे. या कायद्याने खूप मोठ्या प्रमाणात चेक आणि बॅलन्सेस तयार केलेत. त्याआधारे अशाप्रकारची माहिती हवी असल्यास मिळवता येते. त्याची एक मोडस ऑपरेंडी ठरवून देण्यात आलीय, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं .

फडणवीस म्हणाले, सपा नेते अमरसिंह यांनी १९ जानेवारी २००६ रोजी डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार फोन टॅपिंग करतंय असा आरोप केला होता. त्यानंतर सीताराम येचुरी, जयललिता, चंद्रबाबू नायडू यांनीही हेच आरोप केले. त्यावर मनमोहन सिंग यांनी हे फोन सरकारने टॅप केलेले नसून खासगी संस्थेने केले आहेत असं उत्तर दिलं. या प्रकरणी भुपेंदर सिंग नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली.

१७ ऑक्टोबर २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील बंगालच्या त्यावेळच्या कम्युनिस्ट सरकारवर फोन, इमेल आणि एसएमएस टॅपिंग केल्याचा आरोप केला. २६ एप्रिल २०१० रोजी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर संसदेत मोठा गोंधळ झाला त्यावेळी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग याबाबत भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं. तेव्हा मनमोहन सिंग यांनी जेपीसी करण्याची गरज नाही असं सांगितलं होतं. जे झालंय ते कायदेशीर झालंय, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button