मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करणार
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शुक्रवार) कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा यापूर्वी हवामान विभागानं कोल्हापूरला रेड अॅलर्ट दिल्यानं रद्द करण्यात आला होता. आज सकाळी ८.४० वाजता मुख्यमंत्री कोल्हापूरकडे जाण्यासाठी मातोश्री निवासस्थानावरुन निघतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझकडे रवाना होतील. विमानतळावरुन कोल्हापूरला जातील. कोल्हापूर विमानतळावरुन मोटारीने शिरोळ-नृसिंहवाडी रोडकडे रवाना होतील. शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. त्यानंतर शाहूपूरी ६वी गल्ली, कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करतील. त्यानंतर पंचगंगा हॉस्पिटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथील पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. कोल्हापूरमधील पूरबाधित भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ११ ते १.३० पर्यंत करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता कोल्हापूरमधील पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. उद्धव ठाकरे दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होतील.