Top Newsराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

खुद्द आदित्य ठाकरे बनले सारथी

उद्धव ठाकरे यांना त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत वर्षावर नेलं. खरं तर आदित्य ठाकरे यांच्या जागी मनसे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे गाडी चालवताना दिसतील असा कयास अनेकांनी बांधला होता. याचं कारण म्हणजे २०१२ साली जेव्हा उद्धव ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणलं होतं. मात्र, यावेळी राज यांची जागा घेतली ती उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला आहे.

उद्धव ठाकरेंच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर सीएमओने एक निवेदन जारी केले होते. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ऑपरेशननंतर त्यांना त्यांच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी सिंह यांनी फोनवरुन संवाद साधत ही चौकशी केली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button