वादग्रस्त विधान प्रकरणी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना रायपूर पोलिसांनी अटक केलं आहे. भूपेश बघेल यांचे वडिल नंद कुमार बघेल यांनी ब्राम्हण समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यामुळे त्यांच्याविरोधात रायपूरमधील डीडी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. नंद कुमार बघेल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंद कुमार बघेल यांना न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे की, माझ्या सरकारमध्ये सर्वांना कायदा समान आहे. मग ते मुख्यमंत्र्यांचे ८६ वर्षीय वडिल असो, अशा शब्दांत भूपेश बघेल यांनी भूमिका मांडली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडिल नंद कुमार बघेल यांनी ब्राम्हण समाजाविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केलं होते. यामुळे संतप्त ब्राम्हण समाजाने नंदकुमार बघेल यांच्याविरोधात रायपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. यानुसार नंदकुमार यांच्यावर कारवाई करण्यात आली. नंदकुमार यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व ब्राम्हण समाजाच्या तक्रारीनंतर डीडी नगर पोलिसांनी शनिवारी रात्री ८६ वर्षीय नंदकुमार बघेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. नंदकुमार यांच्याविरोधात भारतीय दंड वि कलम १५३ -अ विविध समूहा धर्म, जाति, जन्मस्थान, निवास आणि भाषेच्या आधारावर आक्षेपार्ह वक्तव्य करणं आणि ५०५-१ (ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी ब्राम्हण समाजाला विदेशी म्हणत लोकांना त्यांच्यावर बहिष्कार करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच ब्राम्हणांना गावात घुसु न देण्याचे आवाहन केल आहे. असे ब्राम्हण समाजाने आपल्या एफआयआरमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.